दोन्ही आयुक्तांच्या वेगवेगळ्या आदेशाने उडाला गोंधळ !
लॉक डाऊन संदर्भात मनपा तसेच पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात वेगवेगळ्या वेळा निश्चित केल्याने दूध विक्रेते आणि पेट्रोल पंपचालक गोंधळात सापडले आहेत. त्यामुळे दोन आयुक्तांचे हम दो... हमारे दो... अशी चर्चा सुरू झाली आहे.
शहर लॉक डाऊन होणार याची घोषणा विभागीय आयुक्तालयात ६ जुलैच्या बैठकीत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच वेळी १० जुलैपासून शहर लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तब्बल तीन दिवस शहरात काय सुरू आणि काय बंद असेल यावर मंथन करण्यात आले. त्यानुसार काल सायंकाळी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आदेश जारी केले.
...दोन्ही आयुक्तांच्या वेळा वेगवेगळ्या !
दरम्यान, मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशात दूध विक्रेते आणि वर्तमानपत्र वितरण करणाऱ्यांसाठी सकाळी ६ ते ८:३० ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर पेट्रोल पंप चालकांसाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे या वेळेनंतर बाहेर फिरणारे दूध विक्रेते अथवा पेट्रोल पंप चालकावर गुन्हा दाखल होणार आहे. दुसरीकडे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी काढलेल्या आदेशानुसार दूध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ हा वेळ निश्चित करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर पेट्रोल पंप सकाळी १० ते २ या वेळेत सुरू राहतील असेही आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
उडाला गोंधळ !
दरम्यान दूध विक्रेते आणि वर्तमानपत्र विक्रेते यांच्या वेळेमध्ये मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्या आदेशात अर्धा तासाचा फरक आहे. पोलीस आयुक्त सकाळी नऊ वाजेपर्यंत परवानगी देत आहेत तर मनपा आयुक्तांनी साडेआठ वाजेपर्यंत किती वेळ निश्चित करून दिली आहे. दुसरीकडे पोलिस आयुक्तांनी पेट्रोल पंप चालकांना सकाळी दहा वाजता पंप खुले करण्यास परवानगी दिली तर मनपा आयुक्तांनी सकाळी नऊ वाजता पेट्रोल पंप सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पुरता गोंधळ उडाला आहे.











